Saree Stories

अशी घ्या काळजी पैठणीची

पैठणी ही फक्त एक साडी नाही. तर ती पिढ्यान् पिढ्यांची परंपरा आहे. अशा या गर्भरेशमी साडीचं सौदर्य जपणं तितकचं महत्वाचं आहे. शुद्ध रेशीम आणि झरीने विणलेली पैठणी योग्य काळजी घेतली तर आयुष्यभर तिचं सौंदर्य तसंच टिकून राहतं.

पैठणीसारखी साडी दीर्घकाळ जपताना कपाटातील ओलावा, किडे किंवा धूळ यापासून तिचं रक्षण करणं अत्यंत गरजेचं असतं. पैठणी ठेवलेल्या जागी नेहमी स्वच्छता आणि कोरडेपणा राखा. जुनी किंवा पारंपरिक पैठणी असेल तर तिला अधूनमधून हवेत पसरून ठेवणं खूप आवश्यक असतं. यामुळे साडीचा पोत आणि घडी दोन्ही छान राहतात. योग्य जपणूक केल्यास पैठणीचा रंग, नक्षी आणि तेज वर्षानुवर्षे उजळत राहतं. काही सोपे पण महत्त्वाचे उपाय तुमची पैठणी दीर्घकाळ तेजस्वी आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करतील.

  • पैठणी साडी नेहमी सरळ, घडी घालून ठेवावी. पॅकिंगसाठी मिळणाऱ्या प्लास्टिक कव्हरमध्ये ओलावा अडकून रेशीम खराब होऊ शकतं. पैठणी कॉटन कव्हर किंवा मलमलच्या कपड्यात ठेवणे उत्तम.
  • साडी दीर्घकाळ एकाच घडीवर ठेवल्यामुळे काठ किंवा पदरावर कायमची रेषा पडू शकते. त्यामुळे प्रत्येक महिन्यांनी साडीची घडी बदलून परत ठेवावी.
  • तुम्ही परफ्यूम वापरणार असाल तर तो साडीवर मारणार नाही याची काळजी घ्या. कारण झरी आणि रेशीमावर केमिकल्सचा परिणाम होऊन रंग आणि पोत खराब होतात.
  • साडी नेसून झाल्यावर ती काही वेळ उघड्यावर पसरून ठेवा. पण, कडक उन्हात ठेवलेली पैठणी फिकट होऊ शकते. हवा खेळती असेल अशा सावलीत साडी वाळवावी.
  • पैठणी नेसताना दागिने साडीवर अडकणार नाहीत याची थोडी काळजी घ्या. कारण जरीत अडकून धागे निघू शकतात.
  • पैठणी घरात धुतल्यास झरी, रंग आणि रेशीमाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ही साडी नेहमी ड्राय क्लिनच करावी.
  • इस्त्री करताना शीमासाठी नेहमी लो-हीट किंवा स्टीम इस्त्री वापरावी. साडीवर थेट इस्त्री न लावता त्यावर कापड टाकून इस्त्री करा.
  • पैठणी साडी हॅंगरवर टांगणे टाळा- कारण काठ आणि पदर ताणले जाऊ शकतात. त्यामुळे साडीचं सौंदर्य कमी होऊ शकतं.
  • प्रवासादरम्यान पैठणी साडी बरोबर नेताना गारमेंट बॅग वापरा. त्यामुळे साडी सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल.
  • साडी खूप दिवस वापरली नसेल तर हवा दाखवा — 2–3 महिन्यांनी काही मिनिटं पसरून ठेवा.

योग्य काळजी घेतली तर पैठणीचं सौंदर्य वर्षानुवर्षे अबाधित राहतं. तिच्या प्रत्येक धाग्यात असलेली मेहनत, कौशल्य आणि परंपरा जपण्यासाठी हे उपाय अत्यंत उपयुक्त आहेत.